“पंचगंगेच्या तीरावर भक्तीचा महासागर!”
“पंचगंगेच्या तीरावर भक्तीचा महासागर!” महाआरती सोहळ्याने कोल्हापूर दुमदुमले; हजारो भाविकांची उपस्थिती.
---------------------------------------कोल्हापूर प्रतिनिधी : विजय बकरे.
---------------------------------------
कोल्हापूरच्या पवित्र पंचगंगा नदी तीरावर सोमवारी भक्ती, परंपरा आणि अध्यात्माचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. पंचगंगा नदीच्या प्रकट दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महाआरती सोहळ्याला भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. सूर्यास्तानंतर नदीकाठ संपूर्ण दीपप्रकाशाने उजळून निघाला आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात परिसर भक्तिमय झाला.
कोल्हापुरातील भक्त मंडळातर्फे गेली तब्बल १८ वर्षे हा पारंपरिक सोहळा उत्साहात साजरा केला जात असून यंदाही मोठ्या भक्तिभावाने पंचगंगा नदीचे विधिवत पूजन करण्यात आले. होमहवन, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधीनंतर नदीची साडी-चोळीने ओटी भरून महाआरती करण्यात आली.
या वेळी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि मधुरिमाराजे यांच्या हस्ते पंचगंगेची महाआरती करण्यात आली. श्री करवीर माहात्म्य ग्रंथातील परंपरेनुसार नदीपूजन करण्यात आल्याने सोहळ्याला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले.
तांदळाच्या पिठाचे जलचर ठरले आकर्षण
सोहळ्यात कुंभार समाजातर्फे करण्यात आलेला अनोखा उपक्रम विशेष लक्षवेधी ठरला. नदीतील जलचरांसाठी तांदळाच्या पिठापासून कासव, मगर, मासे, बेडूक यांसारखे विविध जलचर तयार करून ते नदीत अर्पण करण्यात आले. पर्यावरणपूरक आणि पारंपरिक स्वरूपाच्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक करण्यात आले.
समाजाचे अध्यक्ष शिवाजी वडणगेकर, उपाध्यक्ष प्रल्हाद पुरेकर यांनी या उपक्रमाचे संयोजन केले. तसेच करवीर पीठ, पुरोहित संघाचे पदाधिकारी आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपूर्ण धार्मिक विधी पार पडले.
मंडळाचे अध्यक्ष सुधाकर भांदिगरे, माजी अध्यक्ष राजाभाऊ कुंभार, प्रफुल्ल भाट, कृष्णात पाटील, निवास ब्रम्हपुरे, राजेंद्र बुचडे, बाबा दिंडे, भारत वास्कर आदींनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

No comments: