डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली ५९ लाखांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळी सांगली सायबर पोलिसांच्या जाळ्यात..
“डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली ५९ लाखांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळी सांगली सायबर पोलिसांच्या जाळ्यात सीबीआय, सुप्रीम कोर्ट, आरबीआयचे बनावट लेटर पाठवून नागरिकाला घातला गंडा; पुण्यातून दोन आरोपी अटकेत.
------------------------------------सांगली : “तुमच्यावर गंभीर गुन्हा दाखल असून अटक होणार आहे,” अशी भीती दाखवत स्वतःला सीबीआय व इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी सांगणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश सांगली सायबर पोलिसांनी केला आहे. तासगाव तालुक्यातील सावळज येथील सेवानिवृत्त नागरिकाची तब्बल ५९ लाख ९ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०४/२०२६ अन्वये बीएनएस कलम ३१८(४), ३३८, ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या कलम ६६ व ६६सी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी आण्णासाहेब बाळगोंडा पाटील (वय ६१, रा. सावळज, ता. तासगाव) यांना आरोपींनी व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल करून आपण पोलीस, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागातील वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवले. आरोपींनी आपल्या व्हॉट्सअॅप प्रोफाइलवर पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो लावले होते. तसेच “गव्हर्नमेंट ऑफ इंडिया”, “सुप्रीम कोर्ट”, “रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया” यांच्या नावाची बनावट पत्रे पाठवून अटक करण्याची धमकी दिली. या भीतीपोटी फिर्यादींकडून विविध खात्यांमध्ये लाखो रुपये वर्ग करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
सांगली सायबर पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी अबु हुसेन समसुल आलम (रा. हडपसर, पुणे, मूळ पश्चिम बंगाल) आणि सुशील अकील राम (रा. मगरपट्टा, पुणे, मूळ पश्चिम बंगाल) यांना अटक केली. आरोपींच्या खात्यावर फिर्यादींच्या फसवणुकीतील २९ लाख ६० हजार रुपये जमा झाल्याचे समोर आले आहे.
पोलीसांनी आरोपींच्या घरझडतीत ४ मोबाईल फोन, विविध बँकांचे १८ डेबिट-क्रेडिट कार्ड, २४ चेकबुक, ६ पासबुक, ६ सिमकार्ड, रिकामे सिम पाकीट तसेच आधार-पॅन कार्ड असा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक रूपाली बोबडे तसेच सांगली सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
दरम्यान, “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली होणाऱ्या सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असून नागरिकांनी अशा धमक्यांना बळी न पडता त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

No comments: