आंबा वनपरिक्षेत्रातील वनवा प्रकरणी १० आरोपींवर कारवाई; देवरूख न्यायालयाकडून २८ मेपर्यंत वन कोठडी.
आंबा वनपरिक्षेत्रातील वनवा प्रकरणी १० आरोपींवर कारवाई; देवरूख न्यायालयाकडून २८ मेपर्यंत वन कोठडी.
----------------------------------------मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते.
-----------------------------------`---
सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील निवळे व गोठणे परिसरात ५ मे २०२६ रोजी लागलेल्या भीषण वनवा प्रकरणात वन विभागाने कठोर कारवाई करत आतापर्यंत १० आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपींना देवरूख न्यायालयाने २८ मे २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
आंबा वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून हा वनवा नियंत्रणात आणला होता. त्यानंतर गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपास सुरू करण्यात आला.
या प्रकरणात प्रथम बापू बाजू चौगुले (रा. कोतोली धनगरवाडा, ता. शाहूवाडी) यास ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात बाबुराव धोंडीबा येडगे, भागोजी बाबुराव कोळेकर व नामदेव लहू येडगे (रा. सर्व कोतोली धनगरवाडा, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान सावळा धोंडीबा झोरे, नागेश बापू शेळके उर्फ नागू फाले, विठ्ठल जनू गावडे, बबन बाबू गावडे, धोंडीबा बाबू गावडे व जनू उर्फ जयराम रामू गावडे (रा. सर्व अंबाईवाडा, ता. शाहूवाडी) या सहा आरोपींचाही सहभाग निष्पन्न झाला. त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. शाहूवाडी न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर गोठणे येथील स्वतंत्र वनवा प्रकरणात त्यांना पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना देवरूख न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने २८ मे २०२६ पर्यंत वन कोठडी सुनावली.
वन विभागाच्या माहितीनुसार, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रामध्ये वनवा लावणे हा गंभीर गुन्हा असून जंगलास आग लावून वन्यजीव अधिवास, जैवविविधता आणि नैसर्गिक संपत्ती धोक्यात आणणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
ही कारवाई क्षेत्र संचालक तुषार चव्हाण, उपसंचालक स्नेहलता पाटील तसेच सहायक वनसंरक्षक संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर करत असून वनपाल सुरेश चरापले, मनिषा देसाई, वनरक्षक विशाल पाटील, अंजली नवले तसेच वाहनचालक व वनमजूर यांनी तपासात सहकार्य केले

No comments: