Header Ads

वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत — १०० टक्के मुद्देमाल हस्तगत

 वयोवृद्ध आजोबांच्या घरफोडीचा छडा; ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, आरोपी अटकेत — १०० टक्के मुद्देमाल हस्तगत.


पुणे (प्रतिनिधी)


नेतवड (कुटेमळा) येथील ९५ वर्षीय वृद्धाच्या घरात झालेल्या घरफोडीचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत ओतूर पोलिसांनी आरोपीला अटक करून चोरीस गेलेले तब्बल ४ लाख २० हजार रुपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळविले आहे. या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, मौजे नेतवड, कुटेमळा (ता. जुन्नर) येथील बजाबा महादू कुटे (वय ९५) यांनी त्यांच्या पत्नीचे सोन्याचे दागिने घरातील पोटमाळ्यावर सुरक्षित ठेवले होते. दरम्यान, दिनांक १ मे ते ७ मे २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने घरातील पेटीचा कडी-कोयंडा तोडून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीस गेलेल्या ऐवजात तीन तोळ्यांचे मनीमंगळसूत्र, अडीच तोळ्यांचे सहा सोन्याचे पान व एक पुतळा, अर्धा तोळ्याची सोन्याची नथ तसेच एक तोळ्याच्या दोन सोन्याच्या पेट्या असा एकूण सात तोळे वजनाचा व ४ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल होता.

याप्रकरणी तान्हाजी बजाबा कुटे (वय ५६, रा. नेतवड कुटेमळा) यांनी ओतूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गु.र.नं. १३०/२०२६ भा.न्या.सं. कलम ३३१(३), ३०५ अन्वये अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाची सूत्रे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांच्याकडे देण्यात आली होती.

ओतूर पोलिसांनी तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी अभिषेक खंडू कुटे (वय ३२, सध्या रा. टिटवाळा, जि. ठाणे, मूळ रा. नेतवड कुटेमळा) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे. दरम्यान, नागरिकांनी मौल्यवान दागिने व रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी तसेच ग्रामपंचायतीमार्फत गावात अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, असे आवाहन ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पो.हवा. नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी तसेच पोलीस कर्मचारी विशाल गोडसे, आशिष जगताप, योगेश उकिर्डे यांनी केली आहे .

No comments:

Powered by Blogger.