Header Ads

अनुस्कुरा घाट मृत्यूचा सापळा! ट्रक-बुलेटची भीषण समोरासमोर धडक; तरुण जागीच ठार, दोघांची प्रकृती चिंताजनक

 अनुस्कुरा घाट मृत्यूचा सापळा! ट्रक-बुलेटची भीषण समोरासमोर धडक; तरुण जागीच ठार, दोघांची प्रकृती चिंताजनक.

----------------`--------------------

मलकापूर प्रतिनिधी : रोहित पास्ते.

-------------------------------------

शाहूवाडी तालुक्यातील धोकादायक ठरत असलेल्या अनुस्कुरा घाटात बुधवारी सायंकाळी भीषण अपघात घडून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. अनुस्कुरा-राजापूर मार्गावरील तीव्र वळणावर मालवाहतूक ट्रक आणि बुलेट मोटारसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने हा थरारक अपघात घडला. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की बुलेटचा अक्षरशः चुराडा झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, निलेश विलास पाटील, ज्योतीराम नामदेव रावण आणि संदीप दादासो पाटील हे तिघेजण बुलेट मोटारसायकलवरून अनुस्कुरा घाटातून प्रवास करत होते. यावेळी समोरून येणाऱ्या मालवाहतूक ट्रकची त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक बसली. धडकेनंतर रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.

या भीषण अपघातात निलेश विलास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर ज्योतीराम रावण आणि संदीप पाटील हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. काही काळ अनुस्कुरा घाटातील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करत मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविला.

दरम्यान, अनुस्कुरा घाटातील धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात होत असल्याने वाहनधारकांत संताप व्यक्त होत आहे. घाटात संरक्षक कठडे, इशारा फलक, रिफ्लेक्टर तसेच वेग नियंत्रण उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Powered by Blogger.