Header Ads

नदीपात्रात गाळ टाकणाऱ्या ठेकेदाराची मनसे स्टाईलमध्ये ‘सफाई’;

नदीपात्रात गाळ टाकणाऱ्या ठेकेदाराची मनसे स्टाईलमध्ये ‘सफाई’; उत्तम चव्हाणांच्या आक्रमक भूमिकेनंतर युद्धपातळीवर गाळ हटविण्याचे काम सुरू!

----------------------------------------

राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे.

-----------------------------------------

राधानगरी तालुक्यातील कौलव येथील नवीन वसाहतीजवळ सुरू असलेल्या पूर संरक्षण धक्का भिंतीच्या कामात मोठा निष्काळजीपणा समोर आला असून, संबंधित ठेकेदाराने कामातून निघालेला प्रचंड गाळ थेट नदीपात्रात टाकल्याने घाट परिसराचे विद्रुपीकरण झाले होते. या प्रकारामुळे ग्रामस्थ आणि पशुपालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते उत्तम चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत संबंधित ठेकेदाराला धारेवर धरताच प्रशासन आणि कंत्राटदाराची झोप उडाली.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या कामादरम्यान नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गाळ टाकण्यात आला होता. त्यामुळे घाट परिसर दलदलीसारखा बनला होता. नदीवर पाणी पिण्यासाठी येणाऱ्या गायी, म्हशी गाळात रुतून बसण्याच्या घटना घडू लागल्याने शेतकरी आणि पशुपालक चिंतेत होते. अनेक ग्रामस्थांनी वारंवार ठेकेदाराकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.

दरम्यान, हा प्रकार समजताच मनसेचे उत्तम चव्हाण यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत संबंधित ठेकेदार पोवार यांना जाब विचारला. मनसेच्या आक्रमक भूमिकेनंतर ठेकेदाराने अखेर आपली चूक मान्य करत यंत्रांच्या सहाय्याने नदीपात्रातील गाळ हटविण्याचे काम तात्काळ सुरू केले.

या घटनेनंतर ग्रामपंचायतीच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अनेक महिन्यांपासून नदीचे विद्रुपीकरण होत असताना ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष का केले? असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

यावेळी पी. के. पडवळे, शिवाजी पडवळे, संदीप चरापले, निवास पडवळे यांच्यासह मनसे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या हस्तक्षेपानंतर अखेर घाट परिसराला दिलासा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments:

Powered by Blogger.