Header Ads

“स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” मोहिमेची जिल्हाभर धूम.

 “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” मोहिमेची जिल्हाभर धूम.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त १ ते ५ जूनदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन

कोल्हापूर : जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हा परिषद कोल्हापूरच्या माध्यमातून “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” ही विशेष मोहीम १ जून ते ५ जून २०२६ या कालावधीत ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि हवामान कृतीबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा शशिकांत खोत यांनी केले आहे.

यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “हवामान कृती” (Climate Action) अशी असून Mission LiFE अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश गावागावांत पोहोचविण्यात येणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, महिला बचत गट, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील 4Rs — Refuse, Reduce, Reuse आणि Recycle तसेच ग्रे-वॉटर व्यवस्थापनातील 3Rs — Reduce, Reuse आणि Recharge या संकल्पनांचा प्रसार केला जाणार आहे. “कचऱ्यापासून संपत्ती”, परिपत्र अर्थव्यवस्था, किचन गार्डन, वृक्षारोपण, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ संदर्भात ग्रामीण भागात व्यापक जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची (BWGs) ओळख, कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, जुने कचरा डेपो नोंदणी आणि घराघरातून कचरा संकलन या बाबींवर विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.

मोहिमेअंतर्गत प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, नुक्कड नाटके, स्वच्छता मोहिमा, विशेष ग्रामसभा तसेच “एक पेड़ माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण अभियान यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभांमध्ये मोहिमेचा आढावा घेण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि हवामान कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या असून मोहिमेतील सर्व उपक्रमांची माहिती SBM(G)-IMIS पोर्टलवर अपलोड करण्यात येणार असल्याचे सांगितले.

No comments:

Powered by Blogger.