Header Ads

“रोहिणीचा पेरा अन् मोत्याचा तुरा”; बरगेवाडी परिसरात भात पेरणीस वेग

 “रोहिणीचा पेरा अन् मोत्याचा तुरा”; बरगेवाडी परिसरात भात पेरणीस वेग रोहिणी नक्षत्र साधण्यासाठी बळीराजाची शिवारात धावपळ; आधुनिक बियाण्यांना पसंती.

--------------------------------
 राधानगरी प्रतिनिधी.
विजय बकरे.
------``------------

राधानगरी तालुक्यातील बरगेवाडी परिसरात सध्या भात पेरणीची लगबग शिगेला पोहोचली असून “रोहिणीचा पेरा आणि मोत्याचा तुरा” हा पारंपरिक मुहूर्त साधण्यासाठी बळीराजा शिवारात अक्षरशः धावपळ करताना दिसत आहे. २५ मेपासून सुरू झालेल्या रोहिणी नक्षत्रात पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत.

रोहिणी नक्षत्रात पडणारा पाऊस भात पिकासाठी अत्यंत लाभदायक मानला जातो. या काळात झालेली भात उगवण जोमदार होत असल्याने उत्पादनातही वाढ होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे वेळेवर पेरणी पूर्ण करण्यासाठी बरगेवाडी परिसरातील शिवारात शेतकऱ्यांची मोठी लगबग पाहायला मिळत आहे.

यंदा भात पेरणी रेगोळे तसेच कुरी पद्धतीने केली जात असून शेतकऱ्यांनी आधुनिक आणि कमी कालावधीत येणाऱ्या बियाण्यांना पसंती दिली आहे. यामध्ये अजिता, वाडा कोलम, तृप्ती, पुनम, कोमल, आर-वन, सुंदर, अमुग, अवनी स्वार्थी आदी वाणांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. ही बियाणे साधारणपणे ११० ते १२५ दिवसांत कापणीस येत असल्याने शेतकऱ्यांचा त्याकडे कल वाढला आहे.

दरम्यान, पावसानेही समाधानकारक हजेरी लावल्याने यंदाच्या हंगामाबाबत शेतकऱ्यांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले आहे.

No comments:

Powered by Blogger.