टॉयलेटमध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह; १२ तासांत आरोपी महिलेचा शोध.
टॉयलेटमध्ये नवजात अर्भकाचा मृतदेह; १२ तासांत आरोपी महिलेचा शोध
मिरज शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; रुग्णालयातील थरार उघड.
-------------------मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या प्रसुती रुग्णालयातील टॉयलेटमध्ये मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळल्याने बुधवारी मिरज शहरात मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक घटनेचा अवघ्या १२ तासांत छडा लावत मिरज शहर पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. २८ मे रोजी प्रसुती रुग्णालयातील सफाई कर्मचारी विजय ईराण्णा पोतराज यांना टॉयलेटमध्ये अपरीपक्व नवजात अर्भक मृत अवस्थेत आढळले. यानंतर मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने विविध पथके तयार करून तपासाला वेग दिला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू असताना एका नर्सने उपचारासाठी येणाऱ्या संशयित गर्भवती महिलेबाबत माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ त्या महिलेचा शोध घेत तिला ताब्यात घेतले.
महिला अधिकाऱ्यांमार्फत कसून चौकशी केली असता संबंधित महिलेने धक्कादायक कबुली दिली. दि. २५ मे रोजी ती पोटदुखीमुळे उपचारासाठी रुग्णालयात आली होती. मात्र उपचारापूर्वीच ती टॉयलेटमध्ये गेली असता तिचा गर्भपात झाला आणि नवजात अर्भक टॉयलेटमध्ये पडले. रक्तस्त्राव झाल्याने ती घाबरली व कोणालाही काही न सांगता टॉयलेट साफ करून रुग्णालयातून निघून गेल्याचे तिने कबूल केले.
महिलेच्या कबुलीनंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

No comments: