Header Ads

सुझलॉन पवनचक्क्यांतील वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त

 सुझलॉन पवनचक्क्यांतील वायर चोरी करणारी टोळी जेरबंद; १.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त.

----------------------------

सातारा, प्रतिनिधी:

अमर इंदलकर.

----------------------------

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधून तांब्याच्या केबल वायरची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखा व पाटण पोलीस ठाण्याच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली. या कारवाईत तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले असून सुमारे १ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे – प्रकाश निवृत्ती निकम (वय ३४), नवनाथ गुलाब कदम (वय २३) आणि पंकज आनंदा कदम (वय २५, सर्व रा. जांभेकरवाडी, ता. पाटण, जि. सातारा) अशी आहेत.

सडावाघापुर व वनकुसवडे (ता. पाटण) परिसरातील सुझलॉन कंपनीच्या पवनचक्क्यांमधून तांब्याच्या तार असलेल्या केबल वायरची चोरी झाल्याची तक्रार पाटण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अंतर्गत दोन गुन्हे नोंद करण्यात आले होते.

तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक परीतोष दातीर यांच्या पथकाने जांभेकरवाडी परिसरातून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून सुमारे २६० किलो केबल वायरमधील तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे १,१३,००० रुपये आहे. तिन्ही आरोपींना ३० एप्रिल २०२६ रोजी अटक करण्यात आली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संबंधित पथकाच्या कार्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून पुढील तपास सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.