Header Ads

शाहुवाडीत रोजगार हमीची कामे ठप्प; ग्रामरोजगार सहाय्यकांच्या आंदोलनामुळे घरकुल लाभार्थी अडचणीत

 शाहुवाडीत रोजगार हमीची कामे ठप्प; ग्रामरोजगार सहाय्यकांच्या आंदोलनामुळे घरकुल लाभार्थी अडचणीत.

-----------------------------------------+

शाहुवाडी प्रतिनिधी : आनंदा तेलवणकर.

--------------------------------------------

शाहुवाडी तालुक्यात ग्रामरोजगार सहाय्यकांनी २ एप्रिलपासून पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे रोजगार हमी योजनेची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून घरकुल लाभार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामरोजगार सहाय्यकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शाहुवाडी तालुका रोजगार हमी संघटनेचे तालुका अध्यक्ष अमर पाटील यांनी सांगितले की, ग्रामरोजगार सहाय्यक गेली पंधरा वर्षे सातत्याने काम करत आहेत. मात्र, त्यांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून मान्यता मिळालेली नाही. शासनाच्या जीआरनुसार मानधन देण्यात विलंब होत असून रोजंदारीप्रमाणे हजेरी लावूनही योग्य मोबदला मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील,” असा इशारा त्यांनी दिला. आंदोलनामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेली विविध विकासकामे बंद पडली आहेत. तसेच घरकुल योजनांच्या प्रक्रियेलाही मोठा फटका बसला आहे.

ग्रामरोजगार सहाय्यक विलास गुडेकर, तुकाराम पाटील आणि विलास कुंभार यांनीही शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईपर्यंत एकही ग्रामरोजगार सहाय्यक कामावर रुजू होणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, रोजगार हमीची कामे बंद पडल्याने ग्रामीण भागातील मजुरांमध्येही अस्वस्थता निर्माण झाली असून शासनाने तातडीने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.