“एका घरात तीन खूनप्रकरणे; कोलोली हादरलं!”
“एका घरात तीन खूनप्रकरणे; कोलोली हादरलं!”
भावांच्या गुन्हेगारी इतिहासानंतर आता अंकुश पाटीलचा महिलेच्या निर्घृण हत्येत सहभाग; गावात खळबळ
पन्हाळा प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कोलोली गावात एका कुटुंबातील तिसऱ्या भावाचाही खूनप्रकरणात सहभाग उघड झाल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. छबुताई सर्जेराव पाटील (वय ५०) या महिलेच्या डोक्यात वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित आरोपी अंकुश हणमंत पाटील याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अत्यंत शिताफीने ताब्यात घेत पन्हाळा पोलिसांच्या हवाली केले. न्यायालयात हजर केले असता आरोपीला १ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छबुताई पाटील या मासूलकी येथील शेतात औषध फवारणीसाठी गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने त्यांचे दिर बाबासो श्रीपती पाटील यांनी नातेवाईकांसह शोध घेतला. त्यावेळी शेतातच त्यांच्या डोक्यात वर्मी वार करून खून झाल्याचे भीषण दृश्य समोर आले.
घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग घटनास्थळी दाखल झाला. मात्र घटनास्थळी कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने तपासात अडथळे निर्माण होत होते. अशावेळी ग्रामपंचायतीने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज पोलिसांसाठी महत्त्वाचा धागा ठरला. आरोपी अंकुश पाटील हा एकाच दिवशी वारंवार कपडे बदलून गावात फिरताना आढळून आला. संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली.
सुरुवातीला “मी काही केले नाही” अशी भूमिका घेणाऱ्या अंकुश पाटीलने अखेर पोलिसी चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली. अतिप्रसंग करण्यास विरोध केल्याने आपण छबुताई पाटील यांचा खून केल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
दरम्यान, अंकुश पाटीलच्या कुटुंबाचा गुन्हेगारी इतिहासही समोर आला आहे. त्याचा एक भाऊ लहू हणमंत पाटील याने यापूर्वी गावातील मित्राचा खून केला होता, मात्र तो सध्या मृत आहे. दुसरा भाऊ आंबाजी हणमंत पाटील याने गणपतराव जाधव यांच्या खूनप्रकरणात शिक्षा भोगत असून तो सध्या जन्मठेपेवर कारागृहात आहे. आता अंकुश पाटील याचाही खूनप्रकरणात सहभाग उघड झाल्याने “एका घरात खुनाची हॅट्रिक” अशी चर्चा गावात रंगू लागली आहे.
या घटनेमुळे कोलोली गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments: