Header Ads

कोल्हापूर पोलिस दलात मोठा प्रशासकीय बदल; रंजन शर्मा यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची धुरा..

 कोल्हापूर पोलिस दलात मोठा प्रशासकीय बदल; रंजन शर्मा यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षकपदाची धुरा

सुनील फुलारी यांची पुणे सीआयडीकडे बदली; राज्यातील ४८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर.

-------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी.
शशिकांत कुंभार.
-------------------------------

कोल्हापूर : राज्याच्या पोलिस प्रशासनात मोठ्या प्रमाणावर फेरबदल करण्यात आले असून, कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी रंजन शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यमान विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) पूर्व विभागाकडे बदली करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने गुरुवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले.

राज्य शासनाच्या गृह विभागाकडून अपर पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक तसेच भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती व बदल्यांचे आदेश जाहीर करण्यात आले. यामध्ये अपर पोलीस महासंचालक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जातील २४, उपमहानिरीक्षक दर्जातील १० आणि आयपीएस दर्जातील १४ अधिकाऱ्यांचा समावेश असून, एकूण ४८ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे शहरात पोलीस सहआयुक्त म्हणून कार्यरत असलेले रंजन शर्मा आता कोल्हापूर परिक्षेत्राची जबाबदारी सांभाळणार आहेत. तर कोल्हापूर परिक्षेत्रात कार्यरत असलेले सुनील फुलारी यांच्याकडे पुणे सीआयडी पूर्व विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे.

कोल्हापूर परिक्षेत्रात कायदा-सुव्यवस्था, संघटित गुन्हेगारी आणि संवेदनशील प्रकरणांच्या तपासासाठी आगामी काळात नव्या नेतृत्वाकडून प्रभावी कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Powered by Blogger.