Header Ads

सह्याद्री व्याघ्र राखीवात शिकारीचा थरार उघड; बंदूक, काडतुसेसह आरोपी जेरबंद — न्यायालयाकडून चार दिवसांची फॉरेस्ट कस्टडी.

 सह्याद्री व्याघ्र राखीवात शिकारीचा थरार उघड; बंदूक, काडतुसेसह आरोपी जेरबंद — न्यायालयाकडून चार दिवसांची फॉरेस्ट कस्टडी.

-------------------------------------

मलकापूर प्रतिनिधी | रोहित पास्ते.

---------------------------------------

सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यजीवांच्या शिकारीसाठी रात्रीच्या अंधारात दबा धरून फिरणाऱ्या एका संशयित शिकाऱ्याला वन विभागाने थरारक कारवाई करत अटक केली आहे. डोक्यावर हेड टॉर्च, हातात १२ बोअर बंदूक आणि जिवंत काडतुसे घेऊन जंगलात फिरणारा आरोपी वन विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला असून या घटनेमुळे वन्यजीव शिकारीच्या हालचाली पुन्हा एकदा समोर आल्या आहेत.

दिनांक १४ मे २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रातील मौजे केर्ले येथील कक्ष क्रमांक १०२९ मध्ये रात्री विशेष गस्त घालण्यात आली होती. रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास जंगल परिसरात संशयास्पद हालचाल दिसून आली. यावेळी डोक्याला टॉर्च लावून हातात बंदूक घेऊन जंगलात फिरत असलेला अनिल कृष्णा जाधव (रा. केर्ले, पैकी नेर्लेकरवाडी, ता. शाहूवाडी) याला वन विभागाच्या पथकाने ताब्यात घेत अटक केली.

आरोपीकडून १२ बोअर बंदूक, जिवंत काडतुसे, हेड टॉर्च आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले असून वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला शाहुवाडी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दिनांक १८ मे २०२६ पर्यंत चार दिवसांची फॉरेस्ट कस्टडी सुनावली.

वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रात अलीकडच्या काळात वन्यजीवांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्त मोहीम राबवण्यात येत असून शिकारीच्या उद्देशाने जंगलात प्रवेश करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. “व्याघ्र राखीव क्षेत्रात वन्यजीवांना धोका निर्माण करणारे कोणतेही बेकायदेशीर कृत्य खपवून घेतले जाणार नाही,” असा इशारा वन विभागाने दिला आहे.

ही कारवाई क्षेत्र संचालक श्री. तुषार चव्हाण, उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील आणि सहायक वनसंरक्षक श्री. संदेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. प्रदीप कोकितकर करीत असून वनपाल श्री. सुरेश चरापले, राहुल पाटील, श्रीमती मनिषा देसाई, वनरक्षक कु. अंजली नवले, वाहनचालक व वनमजूर यांनी कारवाईत सहभाग घेतला.

No comments:

Powered by Blogger.