Header Ads

“बसमधील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला टाकणारा आंतरराज्यीय चोर जेरबंद; २८ लाखांचा मुद्देमाल जप्त”

 “बसमधील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला टाकणारा आंतरराज्यीय चोर जेरबंद; २८ लाखांचा मुद्देमाल.

वडगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; मध्यप्रदेशातून आरोपीला पकडून १४६ ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत

-------------------------
 संस्कार कुंभार.
---------------------===

कोल्हापूर : प्रवासी ट्रॅव्हल्स बसमधून प्रवाशांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आंतरराज्यीय चोरट्याला वडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने मध्यप्रदेशातून अटक करत तब्बल २८ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईमुळे प्रवासी चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून पोलिसांच्या तपास कौशल्याचे कौतुक होत आहे.

दि. १८ मे २०२६ रोजी उयादेवी प्रविणकुमार चौधरी या बेंगलुरूहून राजस्थानकडे जाणाऱ्या NL07/83131 या ट्रॅव्हल्स बसने प्रवास करत होत्या. सकाळी साडेसात ते आठच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील अंबपवाडी येथील बाबा रामदेव ढाब्यावर बस चहापाण्यासाठी थांबली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील सुमारे ११ लाख ५२ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वडगाव पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने तांत्रिक माहिती, गोपनीय सूत्रे आणि तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढला. अखेर मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यातील खेरवाजांग येथून कमरुद्दीन बाबू खान (वय ३९) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपीकडून १४६ ग्रॅम सोन्याचे दागिने, विविध सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली MP09/WM0886 क्रमांकाची केटा गाडी जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत २८ लाख ५२ हजार ६०० रुपये इतकी आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक विजय घेरहे, पोलीस उपनिरीक्षक माधव हिगोळे तसेच गुन्हे शोध पथकातील आसिफ कलायगार, महेश गायकवाड, प्रकाश कांबळे, विजय जाधव, शरद मेनकर, आबा गुंहणके, अनिल आष्टेकर, राहुल धोत्रे, लखन सावंत आणि शेखर कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

दरम्यान, बस प्रवासादरम्यान मौल्यवान वस्तू स्वतःजवळ सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

No comments:

Powered by Blogger.