Header Ads

गांधीनगरमध्ये मध्यरात्री थरार जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर चाकूने सपासप वार; दोघे अटकेत

 गांधीनगरमध्ये मध्यरात्री थरार जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर चाकूने सपासप वार; दोघे अटकेत

-----------------------

कोल्हापूर प्रतिनिधी.

शशिकांत कुंभार.

------------------------

गांधीनगर परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर मध्यरात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी दोघांना अटक केली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश अशोकलाल वद्या (वय 31, रा. गुरुनानक कॉलनी, म्हसोबा रोड, गांधीनगर) हे 13 मे रोजी रात्री ए-वन गल्लीतील कुमार पानपट्टी येथे दूध आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी रोहन अनिल हेगडे (वय 22) आणि करण दिपक हेगडे (वय 21, दोघे रा. झाडुगली, कोयना कॉलनी, गांधीनगर) यांनी विनाकारण शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.

यानंतर मध्यरात्री 1.30 वाजण्याच्या सुमारास म्हसोबा माळ येथील लक्ष्मी एजन्सीसमोर फिर्यादी आपल्या भावासोबत गप्पा मारत उभे असताना आरोपी मोटारसायकलवरून आले. त्यावेळी “तुला खूप मस्ती आली आहे, तुला संपवून टाकतो,” अशी धमकी देत आरोपी रोहन हेगडे याने हातातील चाकूने फिर्यादीच्या पोटावर सपासप तीन वार केले. गंभीर जखमी अवस्थेत फिर्यादीला तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. मात्र गांधीनगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना अटक केली. या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 220/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 109(1), 115(2), 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.