Header Ads

शेतीच्या वादातून जरगवाडीत रक्तरंजित संघर्ष; खोरे-काठ्यांनी हल्ला, महिलेसह तिघे जखमी — एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल.

 शेतीच्या वादातून जरगवाडीत रक्तरंजित संघर्ष; खोरे-काठ्यांनी हल्ला, महिलेसह तिघे जखमी — एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल.

----------------------
शशिकांत कुंभार.
---------------------

करवीर तालुक्यातील जरगवाडी येथे शेतीच्या वादातून दोन गटांमध्ये जोरदार संघर्ष झाल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणात दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या हाणामारीत महिलेसह तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

करवीर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्ह्यानुसार, फिर्यादी कृष्णात आनंदा पाटील (वय 55, रा. जरगवाडी, महे, ता. करवीर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, 13 मे रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास ते मुलगा उमेश पाटील व सून श्रुतिका पाटील यांच्यासह खरी नावाच्या शेतात मशागत करण्यासाठी गेले होते.

त्यावेळी आरोपी भैरू हिंदुराव पाटील, आकाराम हिंदुराव पाटील, ओकार भैरू पाटील व रुपाली भैरू पाटील यांनी शेत आमचे असल्याचा दावा करत फिर्यादींना शेतातून बाहेर पडण्यास सांगितले. त्यानंतर वाद विकोपाला जाऊन आरोपींनी खोरे व काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या मारहाणीत उमेश पाटील यांच्या डोक्यात खोऱ्याने वार करण्यात आला, तर श्रुतिका पाटील यांना काठीने डोक्यावर व पाठीत मारहाण करण्यात आली. फिर्यादी कृष्णात पाटील यांनाही काठीने मारहाण झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. तिघेही जखमी झाल्यानंतर त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 118(1), 115(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून सुरू असून, पोना 2151 चौगले यांनी गुन्हा नोंद केला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दिल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतीच्या वादातून पुन्हा एकदा ग्रामीण भागातील संघर्ष उफाळून आल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

No comments:

Powered by Blogger.