Header Ads

ओढ्यालगत होता मृत्यूचा कारखाना; एलसीबीच्या धाडीत हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त.

 ओढ्यालगत होता मृत्यूचा कारखाना; एलसीबीच्या धाडीत हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त.

------------------------------------
 सांगली कुपवाड मिरज.
 प्रतिनिधी राजू कदम 
---------------------------------

सांगली प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील कर्नाळ परिसरात ओढ्यालगत सुरू असलेला गावठी हातभट्टी दारू निर्मितीचा बेकायदेशीर अड्डा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने उद्ध्वस्त केला. मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या या "मृत्यूच्या कारखान्यातून" ७५० लिटर कच्चे रसायन व अन्य साहित्य असा ३१ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात विशेष मोहीम सुरू आहे. त्याअंतर्गत पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार यांचे पथक माधवनगर परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली.

माहितीनुसार, माधवनगर-कर्नाळ रस्त्यालगत एस.सी. सीड्स अँड फूड्स फॅक्टरीच्या उत्तरेस असलेल्या ओढ्याजवळ काही जण कोळसा व लोखंडी बॅरलच्या सहाय्याने हातभट्टीची दारू तयार करत असल्याचे समजले. पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांची चाहूल लागताच तेथे उपस्थित दोन संशयित इसम अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

यानंतर पोलिसांनी परिसराची कसून तपासणी केली असता ओढ्याच्या काठावर जमिनीत पुरून ठेवलेले पाच लोखंडी बॅरल आढळून आले. या बॅरलमध्ये सुमारे ७५० लिटर कच्चे रसायन साठवलेले होते. तसेच लोखंडी डबे, कॉईल, कोळशाची पोती व दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे अन्य साहित्यही आढळून आले.

ही हातभट्टीची दारू मानवी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारी असल्याने रसायनांचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. उर्वरित रसायन, बॅरल व साहित्य जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून जागीच नष्ट करण्यात आले.

तपासात हा अवैध व्यवसाय नितेश कुंभार मारवाडी व संजय कुंभार मारवाडी (रा. कंजारभाट वस्ती, कर्नाळ, ता. मिरज) यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यात अवैध हातभट्टी दारू तयार करून विक्री करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर आणि धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.