सख्ख्या भावाकडून भावाची निर्घृण हत्या; मलकापूर येथील धक्कादायक घटना.
सख्ख्या भावाकडून भावाची निर्घृण हत्या; मलकापूर येथील धक्कादायक घटना
---------------------------------------मलकापूर (प्रतिनिधी) रोहित पास्ते:
--------------------------------------
शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगर परिषदेच्या पाठीमागे सुरू असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी मध्यरात्री सख्ख्या भावानेच आपल्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी शाहूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत नरेंद्र इतवारी सिदर (वय ३५) आणि आरोपी धीरेंद्र इतवारी सिदर हे दोघे सख्खे भाऊ असून, ते मूळचे छत्तीसगड (मेमरा राज्य) येथील रहिवासी आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी हे दोन्ही भाऊ मलकापूर परिसरात बांधकामाच्या ठिकाणी मजुरीचे काम करत होते. सध्या ते नगर परिषदेच्या मागील बाजूस असलेल्या एका नवीन इमारतीच्या बांधकाम स्थळी वास्तव्यास होते.
काल मध्यरात्रीच्या सुमारास या दोन्ही भावांमध्ये कोणत्यातरी कारणावरून जोरदार वादावादी झाली. या वादाचा राग अनावर झाल्याने आरोपी धीरेंद्र सिदर याने तिथेच पडलेली फरशी, प्लास्टिक पाईप आणि गिलावा करण्यासाठी वापरण्यात येणारी ॲल्युमिनियमची पट्टी या हत्यारांनी नरेंद्र याच्यावर भीषण हल्ला केला.
आरोपीने नरेंद्रच्या तोंडावर, डोळ्याजवळ, कपाळावर आणि हातापायांवर वर्मी घाव घातले. या गंभीर मारहाणीत नरेंद्रचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी धीरेंद्र सिदर घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
पोलिस तपास सुरू आहे.
घटनेची माहिती मिळताच शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत आणि आरोपी हे परराज्यातील मजूर असून ते गेल्या काही काळापासून येथे कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी फिर्याद दाखल झाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.
एका सख्ख्या भावानेच दुसऱ्या भावाचा अशा प्रकारे क्रूर अंत केल्याने मलकापूर परिसरात भीतीचे आणि हळहळीचे वातावरण पसरले आहे. पुढील तपास शाहूवाडी पोलीस करत आहेत.
मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

No comments: