शिरोलीत महामार्गावरील डायव्हर्जन ठरतंय अपघातांना निमंत्रण; दिशादर्शक फलक व बॅरिकेड्सची तातडीची गरज.
शिरोलीत महामार्गावरील डायव्हर्जन ठरतंय अपघातांना निमंत्रण; दिशादर्शक फलक व बॅरिकेड्सची तातडीची गरज.
--------------------------
शशिकांत कुंभार.
---------------------------
शिरोली पुलाची, प्रतिनिधी : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शिरोली पुलाची येथील बाळूमामा मंदिरासमोरील नागाव फाटा परिसरात सुरू असलेल्या नवीन पुलाच्या बांधकामामुळे वाहतूक पर्यायी सर्व्हिस रोडकडे वळविण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी लावण्यात आलेले काही बॅरिकेड्स तुटून पडल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
महामार्गावरील भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना नेमका मार्ग कोणता घ्यायचा हे स्पष्टपणे लक्षात येत नसल्याने अनेक वाहनचालक अचानक ब्रेक मारतात किंवा चुकीच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीदरम्यान अपघाताचा धोका अधिक वाढला आहे.
स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी या धोकादायक परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिरोली मदरसा व बाळूमामा मंदिरासमोरील या डायव्हर्जन पॉईंटवर तातडीने तुटलेले बॅरिकेड्स दुरुस्त करून पुरेशा प्रमाणात दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर तसेच इशारा दर्शविणारे फलक बसविण्याची मागणी होत आहे.
संबंधित कंत्राटदार व महामार्ग प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.

No comments: