Header Ads

मिरजमध्ये दहशत माजवण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; तडीपार सराईत आरोपीसह ५ जण ताब्यात.

 मिरजमध्ये दहशत माजवण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद; तडीपार सराईत आरोपीसह ५ जण ताब्यात.

-----------------------------------------

कुपवाड मिरज प्रतिनिधी  :- राजु कदम .

-------------------------------------------


महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या सतर्क कारवाईमुळे मिरज शहरात घातक शस्त्रांसह दहशत माजवण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली. या कारवाईत तडीपार असलेल्या सराईत आरोपीसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, लोखंडी कोयता आणि आलीशान BMW चारचाकी गाडी जप्त करण्यात आली आहे.

दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास मिरज–कुपवाड रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीनुसार, काही संशयित इसम BMW (MH-04-H-6327) गाडीतून घातक शस्त्रांसह शहरात येऊन गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ पथकाला कारवाईचे आदेश दिले.


पोलीस पथकाने सापळा रचून संशयित वाहन अडवले व त्यातील इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये लोखंडी कोयता हे घातक शस्त्र आढळून आले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींमध्ये इजाज उर्फ एजाज अल्फाज शेख (रा. अमन नगर, मिरज), सौरभ कोठेकर (रा. दत्त कॉलनी), शंकर फुले (रा. मौसाळ रोड), बदुद्दीन दर्यावर्दी व समीर शेख (दोघेही रा. अमन नगर) यांचा समावेश आहे.


यातील मुख्य आरोपी इजाज शेख हा खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये पूर्वीपासूनच आरोपी असून, तो सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला आहे. तरीही तो मिरजमध्ये फिरताना आढळल्याने त्याच्याविरुद्ध आणखी गंभीर कारवाई करण्यात येत आहे.

या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११६/२०२६ अन्वये शस्त्र अधिनियम कलम ४, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड करीत आहेत.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळल्याचे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.

दरम्यान, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांविषयी माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.