अवैध दारू वाहतुकीवर सातारा शहर पोलिसांची धडक कारवाई
अवैध दारू वाहतुकीवर सातारा शहर पोलिसांची धडक कारवाई
इको वाहनासह ४.४९ लाखांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक.
--------------------------सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैध दारू वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत इको वाहनासह तब्बल ४ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत प्रताप विजय बाबर (वय ३०, रा. सदर बाजार, सातारा, मूळ रा. किकली, ता. वाई, जि. सातारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिल्या होत्या. त्यानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक कार्यरत होते.
गोपनीय माहितीच्या आधारे शाहू चौक ते पोवई नाका मार्गावरील चैतन्य कॉम्प्युटर शॉर्ट इन्स्टिट्यूटसमोर पोलिसांनी सापळा रचला. यावेळी संशयित इको वाहन क्रमांक MH 11 DA 3160 अडवून तपासणी करण्यात आली. वाहनामध्ये व्हिस्की व बिअरचे एकूण २७ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी दारूसह वाहन असा एकूण ४ लाख ४९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४२२/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (A)(E) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत सपोनि अविनाश माने, पोउनि सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश जाधव, निलेश यादव, विक्रम माने, प्रवीण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते तसेच पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, संतोष घाडगे, सुशांत कदम व सचिन रिटे यांनी सहभाग घेतला. या धडक कारवाईबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पथकाचे अभिनंदन केले आहे.

No comments: