सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; नातेवाईकांचा आरोप आरग परिसरात खळबळ
सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; नातेवाईकांचा आरोप आरग परिसरात खळबळ.
--------------------------------सांगली मिरज कुपवाड.
राजू कदम.
-----------------------------------
मिरज : मिरज तालुक्यातील आरग येथे सासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे आरग परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत महिलेच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत.
निलावती महादेव सटाले (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना ५ मे रोजी सकाळच्या सुमारास आरग-बेळंकी रस्त्यावरील त्यांच्या राहत्या घरी घडली. निलावती यांनी घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
मयत निलावती यांचे माहेर कर्नाटक राज्यातील लोकूर येथे असून, सुमारे १६ वर्षांपूर्वी त्यांचा विवाह आरग येथील महादेव सटाले यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून सासरच्या लोकांकडून वारंवार मानसिक व शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
“वडिलांच्या जमिनीत हिस्सा घेऊन तो आमच्या नावावर करून दे,” असा दबाव टाकत सासरचे लोक निलावती यांचा छळ करत होते. या सततच्या त्रासाला कंटाळून त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

No comments: