कुपवाडात गांजाविक्रीवर पोलिसांचा मोठा प्रहार; रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद
कुपवाडात गांजाविक्रीवर पोलिसांचा मोठा प्रहार; रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद.
-------------सांगलीतील महाराष्ट्र पोलीस यांच्या एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याने नशाविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत बेकायदेशीर गांजा विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला रंगेहात अटक केली. या कारवाईत तब्बल ५२३ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, आरोपीकडून एकूण १३ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत “नशामुक्त भारत अभियान” अंतर्गत अंमली पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवली जात आहे. पोहेकॉ वैभव पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर परिसरातील कुबेर किराणा दुकानामागील चिंचोळ्या बोळात सापळा रचला. त्यावेळी नरसगोंडा उर्फ बंडू आदगोंडा चिंचवाडे (वय ४०) हा गांजा विक्री करताना पोलिसांच्या तावडीत सापडला.
या धाडसी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल थोरात, पोउनि बळीराम पवार, वैभव पाटील, निलेश कोळेकर, राजेश कांबळे, संदीप घस्ते, प्रकाश सांगोलकर यांच्यासह पोलिस पथकाने सहभाग घेतला. ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउनि अमोल थोरात करत आहेत.
दरम्यान, एमआयडीसी कुपवाड पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात कोठेही अंमली पदार्थांची विक्री होत असल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.

No comments: