Header Ads

कोल्हापुरात ‘प्रायव्हेट केबिन’ कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, पाच जणांवर गुन्हे

 कोल्हापुरात ‘प्रायव्हेट केबिन’ कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई; तीन ठिकाणी छापे, पाच जणांवर गुन्हे.

---------------------------------------

कोल्हापूर प्रतिनिधी : रहिम पिंजारी.

---------------------------------------

कोल्हापूर शहरात प्रेमी युगुलांना अश्लील कृत्यांसाठी ‘प्रायव्हेट केबिन’ उपलब्ध करून देणाऱ्या कॅफेंवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरजकर तिकटी परिसरातील बिनखांबी गणेश मंदिर रोडवरील एका कॅफेमध्ये पडदे लावून बंदिस्त ‘प्रायव्हेट केबिन’ तयार करण्यात आले होते. येथे प्रेमी युगुलांना एकांत देऊन अश्लील कृत्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याची माहिती शहर निर्भया पथकाला मिळाल्यानंतर सोमवारी (दि. ४ मे) दुपारी सुमारे २.३० वाजता छापा टाकण्यात आला. या प्रकरणी आकाश दादू कोरवी (वय २८, रा. येवलुज, ता. पन्हाळा) व संकेत राजेंद्र ढाले (वय २९, रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) या दोन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसरी कारवाई मंगळवार पेठेतील ‘कॅफे ७२’ येथे करण्यात आली. येथेही बंदिस्त कप्प्यांमध्ये ग्राहकांना बसण्याची सोय करून अश्लील कृत्यांना वाव दिला जात असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी शुभम मधुकर पाटील (वय २६, रा. मंगळवार पेठ) याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.

तिसऱ्या कारवाईत देवकर पाणंद चौक ते क्रशर चौक दरम्यान असलेल्या एका बेसमेंटमधील ‘द क्राउन कॅफे’वर छापा टाकण्यात आला. हा व्यवसाय कोणत्याही अधिकृत परवान्याशिवाय सुरू असल्याचे तसेच BNSS १६८ अंतर्गत दिलेल्या नोटिसीचे उल्लंघन केल्याचे आढळले. याप्रकरणी रतन राजाराम पाल (वय ३३, रा. सुभाषनगर) व अमरसिंह कामते (रा. मंगळवार पेठ) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही संपूर्ण कारवाई महिला पोलीस उपनिरीक्षक सुजाता चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहर निर्भया पथकाने केली. फिर्यादी म्हणून स्वप्नाली खोत यांनी तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस हवालदारांकडून सुरू आहे.

पोलिसांचा इशारा.

सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्यांना प्रोत्साहन देणारे किंवा नियमांचे उल्लंघन करणारे व्यवसाय चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.