Header Ads

मिरजेत घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; सराईत ‘बोबड्या’सह तिघे जेरबंद

 मिरजेत घरफोडीचा गुन्हा २४ तासांत उघड; सराईत ‘बोबड्या’सह तिघे जेरबंद

---------------------

सांगली मिरज प्रतिनिधी.

राजू कदम.

-------------------------

मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत सराईत गुन्हेगारासह तिघांना अटक केली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णाघाट परिसरात राहणारे कुदरत कादर मुलाणी यांच्या घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करत कपाटातील ५० हजार रुपये व कपड्यांमध्ये ठेवलेली ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. ही घटना १७ एप्रिल रोजी रात्री घडली होती. याप्रकरणी १ मे २०२६ रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक माहिती व गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी संशयितांचा माग काढला. हरीपूर रोड, सांगली येथे लपून बसलेल्या तिघांना पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

१) किसन ऊर्फ बोबड्या उमाशंकर कुंभार (भाटी) (रा. गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)

२) ऋतुराज सुभाष गजमेश्वर (रा. भारतनगर, हरीपूर रोड, सांगली)

३) समर्थ शंकर डवरी (रा. रामनगर, हरीपूर रोड, सांगली)

तपासादरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिली असून चोरीतील रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. तिघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ५ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

विशेष म्हणजे, मुख्य आरोपी किसन ऊर्फ ‘बोबड्या’ कुंभार याच्यावर कोल्हापूर, सातारा तसेच कर्नाटक राज्यात मालमत्तेविरुद्धचे सुमारे २७ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर यापूर्वी तडीपारीची कारवाईही करण्यात आलेली होती.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल मिलिंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शंकर गायकवाड करीत आहेत.

नागरिकांना आवाहन

मालमत्तेविरुद्धचे गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून संशयास्पद हालचालींबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन महात्मा गांधी चौक पोलिसांनी केले आहे.

No comments:

Powered by Blogger.