Header Ads

सातबारासाठी तब्बल सव्वा लाखांची लाच; मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, कोल्हापुरात खळबळ.

 सातबारासाठी तब्बल सव्वा लाखांची लाच; मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात, कोल्हापुरात खळबळ.

~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर प्रतिनिधी.

~~~~~~~~~~~~~~~~

कोल्हापूर जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी विभागाने मोठी कारवाई करत शिरोळ तालुक्यातील मंडळ अधिकाऱ्यासह एका खाजगी व्यक्तीला 60 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतल्याने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

या कारवाईत नृसिंहवाडी मंडळ अधिकारी तथा नांदणीचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वय 44) आणि खाजगी उमेदवार शिवाजी आनंदराव जाधव (वय 61, रा. धरणगुत्ती) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार सातबारावर नाव नोंद करण्यासाठी आरोपींनी तब्बल 1 लाख 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दिल्यानंतर 18 मे रोजी पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली.

या पडताळणीत मंडळ अधिकारी अमितकुमार पाडळकर आणि शिवाजी जाधव यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर 60 हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. त्यानुसार एसीबीने सापळा रचला असता, पाडळकर यांनी तक्रारदारास 60 हजार रुपये शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. जाधव यांनी ही रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तात्काळ दोघांनाही ताब्यात घेतले.

या प्रकरणी शिरोळ पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 व 7अ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.