बाळासाहेबांच्या स्मृतींना करवीर शिवसैनिकांचे अभिवादन; घोषणांनी परिसर दणाणला!
बाळासाहेबांच्या स्मृतींना करवीर शिवसैनिकांचे अभिवादन; घोषणांनी परिसर दणाणला!
करवीर | प्रतिनिधी.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. शिवसेना शाखा क्रमांक ३, बाल हनुमान मित्र मंडळाच्या हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात करवीर तालुकाप्रमुख राजू यादव यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी 'अमर रहे, अमर रहे, बाळासाहेब अमर रहे!' आणि 'परत या, परत या, बाळासाहेब परत या!' अशा जोशपूर्ण घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. बाळासाहेबांच्या आठवणींनी शिवसैनिक भावूक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना राजू यादव म्हणाले, "१७ नोव्हेंबर हा प्रत्येक शिवसैनिकासाठी अत्यंत भावनिक दिवस आहे. शिवसैनिकांचे दैवत, युगपुरुष, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, मराठी मनाचे मानबिंदू आणि हिंदुस्थानचे महान नेते असलेल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."
या अभिवादन कार्यक्रमास बाळासाहेब नलवडे, दीपक पाटील, संतोष चौगुले, विक्रम चौगुले, अरविंद शिंदे, योगेश लोहार, सचिन नागटिळक, शरद माळी, सागर पाटील, दत्ता फराकटे, प्रकाश मुदुगडे, अक्षय परीट, रामराव पाटील, नितीन निकम, धनंजय पाटील, अजित चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
बाळासाहेबांचे विचार आणि शिवसेनेचा भगवा झेंडा सदैव उंच ठेवण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.

No comments: