Header Ads

लग्नाच्या आमिषाने ३ लाख ९० हजारांची फसवणूक! पाच वर्षांपासून फरार दोन आरोपी सोलापुरातून जेरबंद

 लग्नाच्या आमिषाने ३ लाख ९० हजारांची फसवणूक! पाच वर्षांपासून फरार दोन आरोपी सोलापुरातून जेरबंद

राधानगरी पोलिसांची सोलापूर जिल्ह्यात शोधमोहीम; महिला आरोपीला कायदेशीर नोटीस.


राधानगरी | प्रतिनिधी.विजय बकरे 

लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने विवाहाचे आमिष दाखवत तब्बल ३ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या पाच वर्षांपासून फरार असलेल्या दोन पाहिजे आरोपींना राधानगरी पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली आहे. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली असून, राधानगरी पोलिसांच्या या शोधमोहिमेमुळे जुन्या फसवणूक प्रकरणाला महत्त्वाचे वळण मिळाले आहे.



सन २०२१ मध्ये राधानगरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१८/२०२१ अन्वये भा.दं.वि. कलम ४२०, ४९५, ४९६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींनी लग्न जुळवून देण्याच्या बहाण्याने फिर्यादी आणि त्यांचे मित्र श्रीकांत ज्ञानदेव जाधव यांची फसवणूक केली होती. संबंधित महिलांचे यापूर्वी विवाह झाले असल्याची माहिती लपवून त्यांचे विवाह लावून दिल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात फिर्यादीची २ लाख १० हजार रुपये, तर त्यांचे मित्र श्रीकांत जाधव यांची १ लाख ८० हजार रुपये, अशी एकूण ३ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामध्ये रोख रक्कम तसेच वधूच्या अंगावरील सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश होता.

या गुन्ह्यातील काही आरोपींविरुद्ध यापूर्वी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, चेतन प्रल्हाद गायकवाड (वय ३५) आणि पंकज श्रावण भालेराव (वय २८, दोघेही रा. सोलापूर) हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी विशेष शोधमोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते.

त्यानुसार राधानगरी पोलिसांच्या पथकाने सोलापूर जिल्ह्यात जाऊन स्थानिक पातळीवर शोध घेतला. या मोहिमेत दोन्ही आरोपींना १६ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. तसेच महिला आरोपी अश्विनी श्रावण भालेराव (रा. सोलापूर) हिला कायदेशीर तरतुदीनुसार नोटीस बजावण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सिद, पोलीस उपनिरीक्षक खोत, पोलीस हेडकॉन्स्टेबल खामकर, पाटील आणि महिला पोलीस शिपाई डकरे यांच्या पथकाने केली.

पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपींचा सोलापूरमध्ये शोध घेऊन अटक करण्यात आल्याने राधानगरी पोलिसांच्या तपासाला यश आले आहे.

No comments:

Powered by Blogger.