'फोटो व्हायरल'च्या धमकीतून उघड झाले धक्कादायक जाळे!महाविद्यालयीन तरुणीच्या तक्रारीनंतर चार युवक अटकेत; मुरगूड पोलिसांची मध्यरात्री धडक कारवाई
फिर्यादीनुसार, ओळखपत्र तयार करण्याच्या बहाण्याने तरुणीशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर तिचे कथित आक्षेपार्ह फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. या भीतीचा गैरफायदा घेत विविध ठिकाणी नेऊन तिचे शारीरिक व मानसिक शोषण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, एका आरोपीकडून सुरू झालेला हा प्रकार पुढे इतर युवकांपर्यंत पोहोचला. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या माध्यमातून तरुणीवर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच प्रकरण मिटविण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचाही उल्लेख फिर्यादीत आहे.
घटनेची माहिती मिळताच मुरगूड पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीनंतर चारही संशयितांना रात्री ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माननीय न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियाचा गैरवापर आणि सायबर ब्लॅकमेलिंगच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments: