Header Ads

गांधीनगरची ओळख कपड्यासाठी की अवैध धंद्यासाठी?

 गांधीनगरची ओळख कपड्यासाठी की अवैध धंद्यासाठी?

शिवसेनेचा संतप्त सवाल; प्रशासनाने तातडीने जागे होण्याची गरज.

कोल्हापूर प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख कापड बाजारपेठ म्हणून देशभरात ओळख असलेल्या गांधीनगरची प्रतिमा सध्या धोक्यात आली असून, "गांधीनगरची ओळख कपड्यासाठी की अवैध धंद्यासाठी?" असा संतप्त सवाल करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने उपस्थित केला आहे. परिसरातील कथित अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गांधीनगर पोलीस ठाण्यात निवेदन दिले.

निवेदनात क्रिकेट बेटिंग, गुटखा, मावा, नशेच्या गोळ्या, गांजा, अवैध दारू विक्री, खाजगी सावकारी, चोरी, मारामारी आणि इतर बेकायदेशीर प्रकारांवर तातडीने अंकुश आणण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेषतः क्रिकेट बेटिंगच्या जाळ्यात अनेक तरुण अडकत असल्याची चर्चा परिसरात असून, त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले म्हणाले, "गांधीनगर ही व्यापारी पेठ अनेक वर्षांच्या कष्टातून उभी राहिली आहे. मात्र काही अवैध प्रवृत्तींमुळे तिची प्रतिमा मलिन होत आहे. जर बेटिंग आणि इतर अवैध धंद्यांमुळे तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असेल तर प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक आहे."

करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनीही गांधीनगरच्या व्यापारी प्रतिष्ठेला धक्का बसत असल्याची खंत व्यक्त केली. "आज गांधीनगरची ओळख कापड बाजारपेठ म्हणून असताना अवैध व्यवसायांच्या चर्चांमुळे तिचा लौकिक धोक्यात आला आहे. व्यापारी, नागरिक आणि तरुणांच्या हितासाठी सर्व बेकायदेशीर प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे," असे ते म्हणाले.

दरम्यान, पोलिसांनी सध्या परिसरात अवैध व्यवसाय आढळून आले नसल्याचे सांगितले. मात्र असे प्रकार निदर्शनास आल्यास संबंधितांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

या निवेदनावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, तालुका प्रमुख राजू यादव, शहर समन्वयक सागर साळोखे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

एकेकाळी कापड व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या गांधीनगरची ओळख पुन्हा सकारात्मक कारणांसाठीच राहावी, अशी अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

No comments:

Powered by Blogger.