जन्मदात्या पित्याचा मुलाने केला खून; विहिरीतील मृतदेहाच्या रहस्याचा २४ तासांत उलगडा
जन्मदात्या पित्याचा मुलाने केला खून; विहिरीतील मृतदेहाच्या रहस्याचा २४ तासांत उलगडा.
------------------------------------
शिरोली एमआयडीसी परिसरात हरविलेल्या व्यक्तीच्या शोधातून उघडकीस आलेल्या खळबळजनक खून प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. जन्मदात्या पित्याचाच खून मुलाने आणि त्याच्या साथीदाराने केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले असून, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत दोघांना अटक केली आहे.
पुलाची शिरोली येथील रहिवासी फिरोज खानसो मुजावर (वय ४४) हे २९ मे रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. त्यानंतर २ जून रोजी घोल परिसरातील एका शेतातील विहिरीत पुरुषाचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात मृताच्या तोंडात कापड कोंबून डोक्यावर धारदार हत्याराने वार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
तपासादरम्यान पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, मोबाईल लोकेशन व इतर माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत फिरोज मुजावर यांचा खून त्यांच्या मुलाने साथीदाराच्या मदतीने केल्याचे समोर आले. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकण्यात आल्याचेही उघड झाले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा अवघ्या २४ तासांत उलगडा केला.
या घटनेमुळे शिरोली परिसरात मोठी खळबळ उडाली असून, जन्मदात्या पित्याचाच मुलाने खून केल्याच्या आरोपामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

No comments: