मिरजमध्ये खुनाच्या प्रयत्नातील सराईत मतीन काझी टोळी जेरबंद; गांधी चौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई
मिरजमध्ये खुनाच्या प्रयत्नातील सराईत मतीन काझी टोळी जेरबंद; गांधी चौक पोलिसांची धडाकेबाज कारवाई.
---------------------------------मिरज, प्रतिनिधी : मिरज शहरातील खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार मतीन काझी व त्याच्या टोळीतील पाच जणांना गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली असून, या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे.
२ जून रोजी दुपारी टाकळी रोडवरील चाँद मशिदीजवळ शिवप्रसाद अथणीकर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. अथणीकर हे मित्रांसोबत उभे असताना भरधाव वेगाने आलेल्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर कारमधून उतरलेल्या आरोपींनी कोयता, तलवार, कुऱ्हाड व चाकूच्या सहाय्याने त्यांच्यावर सपासप वार करून गंभीर जखमी केले. जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व मिरज शहर पोलीस ठाण्याची स्वतंत्र पथके मिरज परिसरासह कर्नाटकातील विविध भागात रवाना करण्यात आली होती. तपासादरम्यान गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते.
दरम्यान, ४ जून रोजी रात्री गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकाला आरोपी मिरजमधील हॉटेल सरपंच परिसरातील एका बंद घराच्या आडोशाला लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मतीन साहेबपिर चमनमलिक ऊर्फ काझी (वय २९), शौकत मेहबूब शेख (२६), आयान सलीम लांडगे (२३), साकीब जहीर खान (२२), शोएब इरशाद शेख (२२) तसेच एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्र्य पुजारी करीत आहेत.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगुले, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच मिरज शहर व गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केली.
"खुनाच्या प्रयत्नातील सराईत टोळीला अवघ्या दोन दिवसांत जेरबंद करून मिरज पोलिसांनी गुन्हेगारांना कडक इशारा दिला आहे."

No comments: