"आरोग्य केंद्रात अचानक धाड; जि.प. सदस्या अमृता डोंगळे यांचा कामचुकार कर्मचाऱ्यांना सज्जड दम!"
"आरोग्य केंद्रात अचानक धाड; जि.प. सदस्या अमृता डोंगळे यांचा कामचुकार कर्मचाऱ्यांना सज्जड दम!"
कसबा तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील गैरहजेरीचा भांडाफोड; रुग्णांच्या तक्रारींची घेतली गंभीर दखल.
--------------------------------------
राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे
---------------------------------------
राधानगरी तालुक्यातील कसबा तारळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषद सदस्या अमृता डोंगळे यांनी दिलेल्या अचानक भेटीत अनेक कर्मचारी शासकीय वेळेत गैरहजर असल्याचे उघडकीस आले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या डोंगळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला.
कसबा तारळे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सुमारे २५ ते ३० गावांतील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोग्य केंद्रातील ढिसाळ कारभार, कर्मचाऱ्यांची गैरहजेरी आणि रुग्णांची होणारी हेळसांड याबाबत विविध गावांमधून सातत्याने तक्रारी येत होत्या. या तक्रारींची दखल घेत डोंगळे यांनी मंगळवारी सकाळी कोणतीही पूर्वकल्पना न देता आरोग्य केंद्राला भेट दिली.
भेटीदरम्यान अनेक कर्मचारी कर्तव्यावर अनुपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO) आणि तालुका आरोग्य अधिकारी (THO) यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तसेच उशिरा आलेल्या आणि गैरहजर कर्मचाऱ्यांना जबाबदारीची जाणीव करून देत कडक शब्दांत समज दिली.
"ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे. यापुढे रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असा स्पष्ट इशारा डोंगळे यांनी दिला.
या अचानक झालेल्या तपासणीमुळे आरोग्य केंद्र परिसरात काही काळ गंभीर वातावरण निर्माण झाले होते. यानंतर संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भविष्यात कोणतीही तक्रार येणार नाही, कामकाजात शिस्त राखली जाईल आणि रुग्णांना तत्पर सेवा दिली जाईल, अशी लेखी व तोंडी ग्वाही दिली.
अमृता डोंगळे यांच्या या धाडसी आणि जनहिताच्या भूमिकेचे उपस्थित रुग्ण व स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

No comments: