दूधगंगा खोऱ्यात पिसाळलेल्या कोल्ह्याचा धुमाकूळ; चौघे जखमी, एकाला सीपीआरमध्ये हलविले
दूधगंगा खोऱ्यात पिसाळलेल्या कोल्ह्याचा धुमाकूळ; चौघे जखमी, एकाला सीपीआरमध्ये हलविले
आठवडाभरात दुसरी वन्यप्राण्यांची दहशत; माकडानंतर आता कोल्ह्याने उडवली खळबळ.
---------------------------------------राधानगरी तालुक्यातील दूधगंगा नदी परिसरात गुरुवारी (दि. ४ जून) पिसाळलेल्या कोल्ह्याने अक्षरशः धुमाकूळ घालत शेतात काम करणाऱ्या नागरिकांवर हल्ले चढविल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अचानक झालेल्या हल्ल्यांमध्ये चौघेजण जखमी झाले असून त्यापैकी एकाला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दूधगंगा नदीकाठच्या शेतांमध्ये नेहमीप्रमाणे शेतीची कामे सुरू असताना पिसाळलेल्या कोल्ह्याने अचानक नागरिकांवर झडप घातली. कोल्ह्याच्या हल्ल्यात मालवे गावातील तिघे आणि सरवडे येथील एकजण जखमी झाला. तिघांच्या पायाला कोल्ह्याने जबर चावा घेतला, तर एका महिलेच्या पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली.
जखमींना तातडीने सोळांकूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीचा विचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले.
विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात सोळांकूर परिसरात पिसाळलेल्या माकडानेही नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली होती. अनेकांवर हल्ले करून जखमी केल्यानंतर त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच आता पिसाळलेल्या कोल्ह्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. आठवडाभरात वन्यप्राण्यांच्या सलग हल्ल्यांच्या घटनांमुळे दूधगंगा खोऱ्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोळांकूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कंदाडे यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शेतात काम करताना, सकाळी आणि सायंकाळी बाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित प्रशासनाला माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, पिसाळलेल्या कोल्ह्याचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. वनविभाग आणि संबंधित यंत्रणांनी तात्काळ कारवाई करून दूधगंगा परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments: