Header Ads

लक्ष विचलित करण्याची शक्कल अन् सोन्याच्या गंठणावर हात साफ; पाटोळेवाडीत खळबळ...

 लक्ष विचलित करण्याची शक्कल अन् सोन्याच्या गंठणावर हात साफ; पाटोळेवाडीत खळबळ

वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून दीड लाखांचे गंठण हिसकावले; दुचाकीस्वारांचा धाडसी कारनामा.

-------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी.
 शशिकांत कुंभार.
-------------------------

करवीर तालुक्यातील पाटोळेवाडी परिसरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी एका वृद्ध महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील तब्बल 1 लाख 60 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून पलायन केल्याची घटना सोमवारी (दि. 2 जून) सकाळी 10.45 वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सौ. कल्पना निवास पाटोळे (वय 60, रा. पाटोळेवाडी, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सौ. पाटोळे व त्यांची जाऊ सुवर्णा या घराजवळील सरकारी शौचालयाजवळ उभ्या असताना दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरून तेथे आले. "इथे काळे नावाचे कोणी राहतात का?" अशी विचारणा करत त्यांनी महिलांशी संवाद साधला. त्यानंतर जवळील लाल रंगाच्या इमारतीकडे बोट दाखवत त्यांचे लक्ष दुसरीकडे वळविले.

महिलांचे लक्ष विचलित होताच आरोपींपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील काळ्या मण्यांसह सुमारे 15.780 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून घेतले. चोरीनंतर दोन्ही आरोपी काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून क्षणार्धात पसार झाले.या घटनेत सुमारे 1 लाख 60 हजार रुपयांचे नुकसान झाले असून शाहूपुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2026 च्या कलम 304 (2) व 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दयानंद पाटील यांनी गुन्हा नोंदविला असून सपोनि मगदूम पुढील तपास करीत आहेत. भरदिवसा घडलेल्या या धाडसी प्रकारामुळे पाटोळेवाडी परिसरात खळबळ उडाली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.

No comments:

Powered by Blogger.