महावितरणच्या अनास्थेमुळे पुसद परिसरातील शेती संकटात; कृषी पंपासाठी दिवसा १२ तास वीज देण्याची मागणी
महावितरणच्या अनास्थेमुळे पुसद परिसरातील शेती संकटात; कृषी पंपासाठी दिवसा १२ तास वीज देण्याची मागणी.
------------------------------निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झालेला शेतकरी सध्या महावितरणच्या (MSEDCL) धोरणात्मक अनास्थेमुळे अधिकच भरडला जात आहे. २४ तासांपैकी केवळ ६ तास मिळणारा वीजपुरवठा आणि त्यातही वारंवार होणारे तांत्रिक बिघाड यामुळे विदर्भातील पिके डोळ्यादेखत वाळत आहेत. यवतमाळसह संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांची वाढती कर्जबाजारी स्थिती आणि प्रशासनाची उदासीनता पाहता, शेतकरी पुन्हा एकदा टोकाच्या निर्णयाकडे ढकलला जात आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, निंबी, पार्डी, गणेशपूर आणि कवडीपूरसह परिसरातील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने कार्यकारी अभियंता (महावितरण), पुसद यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे कृषी पंपासाठी दिवसा किमान १२ तास वीज पुरवठा करण्याची तीव्र मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले
खते, बियाणे आणि मजुरीच्या वाढत्या किमतींमुळे शेती करणे आता केवळ तोट्याचे राहिलेले नाही, तर ती एक कसरत बनली आहे. यातच ‘पीक वाळल्यास जबाबदार कोण?’ असा संतप्त प्रश्न शेतकरी विचारत आहेत. विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांची यादी कमी होण्याऐवजी, प्रशासकीय विसंवादामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
वीज पुरवठ्याचे सक्षमीकरण: २४ तासांतून किमान १२ तास अखंडित वीज पुरवठा करावा.
तांत्रिक बिघाड दुरुस्ती: ग्रामीण भागातील फिडर्स आणि ट्रान्सफॉर्मरमधील वारंवार होणारे तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावेत.
आर्थिक नुकसान भरपाई: वीज न मिळाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पिके वाळली आहेत, त्यांचे पंचनामे करून त्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी.
उपोषणाचा इशारा
जर महावितरण प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आणि वेळेवर पाणी न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर या विभागातील सर्व शेतकरी पुसद येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे. यावेळी गजानन दत्तात्रय जाधव, गणेश सावंत, दीपक मोरे, संतोष आंबोरे, अरुण नागुलकर, पंजाबराव ढेकळे, मामा जाधव, दिगंबर देशमुख, संतोष अनकुळे, रमेश भोणे, रवी मारोटकर, मल्हारी मुळे, अजय गरड, शेतकरी मित्र मधुकर चव्हाण, रमेश डंबोळे, शांतीसागर इंगोले यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: