Header Ads

राधानगरी तालुक्यातील चार आरोपींच्या विरोधात गंभीर गुन्हे; तरुणीच्या तक्रारीने खळबळ!

 राधानगरी तालुक्यातील चार आरोपींच्या विरोधात गंभीर गुन्हे; तरुणीच्या तक्रारीने खळबळ!

फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीचा आरोप; चौघांना न्यायालयाकडून ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी.

------------------------------
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी.
शशिकांत कुंभार
--------------------------------

राधानगरी तालुक्यातील चार आरोपींविरुद्ध एका तरुणीने केलेल्या गंभीर तक्रारीमुळे मुरगूडसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार आणि मानसिक छळ केल्याचा आरोप करत पीडित तरुणीने मुरगूड पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची सुरुवातीला आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्याशी ओळख झाली होती. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळ तिट्टा येथे बोलावून घेतले. त्यानंतर मुरगूड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये नेऊन तिचे फोटो काढले व ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

त्यानंतर आरोपीने पीडितेची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकुर, ता. राधानगरी) याच्याशी करून दिली. फिर्यादीनुसार, विविध ठिकाणी तसेच लॉजमध्ये नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले. यावेळी तिचे फोटो व व्हिडिओ काढून बदनामीची भीती दाखवण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

यानंतर प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी ओळख करून देण्यात आली. त्याने सोशल मीडियाद्वारे संपर्क साधून एका लॉजमध्ये नेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे, ता. राधानगरी) यानेही एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादीनुसार, मुरगूड तलाव परिसर, गिरगाव, कात्यायनी, सीबीएस कोल्हापूर परिसरातील लॉज तसेच अन्य ठिकाणी वेळोवेळी हा प्रकार घडला. प्रकरण मिटवून देण्यासाठी पैशांची मागणी करण्यात आली. पैसे दिल्यानंतरही मोबाईलमधील फोटो व व्हिडिओ डिलीट न करण्याच्या धमक्या देत मानसिक छळ सुरूच ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून अखेर त्रास असह्य झाल्यानंतर पीडित तरुणीने मुरगूड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या गंभीर प्रकरणाची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोत्पाल यांनी मुरगूड पोलिस ठाण्याला भेट देऊन तपासाचा आढावा घेतला. दरम्यान, चारही आरोपींना कागल न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे राधानगरी तालुक्यासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

No comments:

Powered by Blogger.