Header Ads

साताऱ्यात पोलिसांचा मोठा स्ट्राईक! गोवा दारूने भरलेला कंटेनर पकडला; जवळपास 2 कोटींचा मुद्देमाल जप्त.

 साताऱ्यात पोलिसांचा मोठा स्ट्राईक! गोवा दारूने भरलेला कंटेनर पकडला; जवळपास 2 कोटींचा मुद्देमाल जप्त.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सातारा | प्रतिनिधी. अमर इंदलकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सातारा तालुका पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू वाहतूक करणारा कंटेनर पकडला. या कारवाईत गोवा बनावटीची दारू, टाटा कंपनीचा कंटेनर आणि मोबाईल असा एकूण 1 कोटी 98 लाख 48 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यातील दारूतस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागातील पोलीस हवालदार महेंद्र नारनवर यांना मौजे शिवथर गावाच्या हद्दीतून टाटा कंपनीच्या कंटेनरमधून गोवा बनावटीची दारू बेकायदेशीररीत्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचला.

दि. 19 जुलै 2026 रोजी सायंकाळी सातच्या सुमारास सातारा–फलटण मार्गावरील शिवथर गावाच्या हद्दीत आरजे 14 जीआर 0539 क्रमांकाचा टाटा कंटेनर अडविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे न देता तपासणीसही आडकाठी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संशय अधिक बळावल्याने पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी करण्यात आली.

तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये 1 कोटी 56 लाख 28 हजार 800 रुपयांची गोवा बनावटीची दारू, अंदाजे 42 लाख रुपयांचा टाटा कंपनीचा कंटेनर आणि 20 हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकूण 1 कोटी 98 लाख 48 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत गुरव करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. निलेश तांबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्वर मुजावर, गोपनीय विभाग व गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित पथकाचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

No comments:

Powered by Blogger.