वारकऱ्यांच्या सेवेतून समाजसेवेचा वसा; इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम.
"वारकऱ्यांच्या सेवेतून समाजसेवेचा वसा; इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचा प्रेरणादायी उपक्रम""वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे । पक्षीही सुस्वरे आळविती ॥"— संत तुकाराम महाराज.
संत सोपानकाका महाराज व संतराज महाराज पालखी सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणात इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय कळंब ता. इंदापूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाने समाजसेवेचा आदर्श घालून देत वारकऱ्यांना दहा हजार बिस्किट पुड्यांचे वाटप केले. हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे पालखी मार्गावर सेवाभाव, भक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
या उपक्रमाचा शुभारंभ प्रतिष्ठानचे विश्वस्त शंकरराव रणसिंग व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांच्या हस्ते झाला. यावेळी उपप्राचार्य ज्ञानेश्वर गुळीग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पालखी सोहळ्याच्या स्वागतावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकांनी अभंग व भजनांच्या सुरावटींनी वातावरण भक्तिमय केले. महिला प्राध्यापकांनी फुगड्या खेळत आणि डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन वारकरी परंपरेचा उत्साहपूर्ण सन्मान केला. या सांस्कृतिक सहभागामुळे उपस्थित वारकऱ्यांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान ही संस्था शिक्षणासोबतच सामाजिक उत्तरदायित्व जपणारी संस्था म्हणून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. शिक्षण, संस्कार, सेवा आणि समाजहित यांचा समतोल साधणारी कार्यसंस्कृती संस्थेने जोपासली आहे. "शिक्षणाबरोबर समाजासाठी काहीतरी देणे हीच खरी संस्थेची ओळख आहे," या विचारातून प्रतिष्ठानची वाटचाल सुरू असून वारकरी सेवेचा हा उपक्रम त्याच सामाजिक जाणिवेचा प्रत्यय देणारा ठरला असल्याचे संस्थेचे सचिव विरसिंह रणसिंग यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त कुलदीप हेगडे, विश्वस्त राही रणसिंग यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वारकऱ्यांच्या सेवेला प्राधान्य देत समाजसेवेचा संदेश कृतीतून दिला.
भक्ती, सेवा आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा संगम घडविणारा हा उपक्रम वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरेला साजेसा ठरला असून, समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या कार्याची ही आणखी एक प्रेरणादायी नोंद ठरली असल्याचे सांगत उपक्रमाविषयी वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

No comments: