Header Ads

लग्नसोहळ्यातील चोरीचा 'हॅपी एंडिंग'! अवघ्या ४८ तासांत चोर जेरबंद; ३ तोळे सोने आणि रोकडसह १००% मुद्देमाल परत.

 लग्नसोहळ्यातील चोरीचा 'हॅपी एंडिंग'! अवघ्या ४८ तासांत चोर जेरबंद; ३ तोळे सोने आणि रोकडसह १००% मुद्देमाल परत.

~~~~~~~±~~~~~~~±~~~~~~
सातारा  प्रतिनिधी. अमर इंदलकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सातारा  :-लग्नाचा आनंद सुरू असतानाच वधूपक्षावर ओढवलेल्या चोरीच्या संकटाचा सातारा शहर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत शेवट केला. कोरेगाव रोडवरील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळ्यादरम्यान ३ तोळे सोन्याचे दागिने आणि ३६ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली. विशेष म्हणजे, चोरीतील ४ लाख ५० हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करून तो मूळ फिर्यादीस परत देण्यात आल्याने पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दि. ९ जुलै २०२६ रोजी दुपारी विवाहसोहळा सुरू असताना वधूपक्षाच्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने पर्समधील दागिने आणि रोकड चोरली होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकाला तपासाचे आदेश दिले. गोपनीय माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यातून संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

या प्रकरणी बाळासो ऊर्फ अजित प्रकाश पाटील (वय २७, रा. पुंगाव, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४.५० लाख रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी तो तात्काळ फिर्यादीस परत करून तपासातील तत्परता आणि कार्यक्षमतेचा आदर्श घालून दिला.

ही यशस्वी कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रवीण कडव, पोलीस नाईक पंकज मोहिते तसेच डी.बी. पथक आणि सायबर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे पार पाडली.

No comments:

Powered by Blogger.