Header Ads

२४ तासांत गोळीबाराचा थरार उघड! इंदोलीजवळ पिस्तूलातून दोन गोळ्या झाडणारे दोघे आरोपी अहिल्यानगरातून जेरबंद.

 २४ तासांत गोळीबाराचा थरार उघड! इंदोलीजवळ पिस्तूलातून दोन गोळ्या झाडणारे दोघे आरोपी अहिल्यानगरातून जेरबंद.


--------------------------------------
सातारा | प्रतिनिधी अमर इंदलकर.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

कराड तालुक्यातील इंदोली पुलाजवळ पैशाच्या व्यवहारातून झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणाचा सातारा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन्ही आरोपींना अहिल्यानगर येथून अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा आणि उंब्रज पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे या खळबळजनक घटनेचा वेगाने उलगडा झाला.

१७ जुलै रोजी रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे पेरले हद्दीतील इंदोली पुलाजवळील पाणंद रस्त्यावर पैशाच्या व्यवहाराच्या कारणावरून संतोष शंकर घोलप (रा. कालगाव, ता. कराड) यांना आरोपी सोमनाथ रमेश चव्हाण याने फोन करून बोलावले. तेथे आरोपी योगेश सुदाम दीक्षित याने फिर्यादीला शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. त्याचवेळी सोमनाथ चव्हाण याने आपल्या फॉर्च्युनर वाहनातून पिस्तूल काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने दोन गोळ्या झाडल्या. गोळ्या चुकविण्याचा प्रयत्न करत असताना त्या फिर्यादीच्या दोन्ही पायांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले.

या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली.

तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि स्थानिक चौकशीच्या आधारे आरोपी अहिल्यानगर येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने कायनेटीक चौक परिसरातील साई सूर्या हॉटेलवर छापा टाकला. या कारवाईत सोमनाथ रमेश चव्हाण (रा. कालगाव, ता. कराड) आणि योगेश सुदाम दीक्षित (रा. मसूर, ता. कराड) या दोघांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी उंब्रज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा व उंब्रज पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले.

No comments:

Powered by Blogger.