Header Ads

वारकऱ्यांच्या सेवेत कुपवाड पोलीस! आषाढी वारीत आहार व पिण्याच्या पाण्याचे वाटप; सामाजिक बांधिलकीचे दर्शन.

 वारकऱ्यांच्या सेवेत कुपवाड पोलीस! आषाढी वारीत आहार व पिण्याच्या पाण्याचे वाटप; सामाजिक बांधिलकीचे दर्शन.

**********************

कुपवाड | प्रतिनिधी राजु कदम

**********************

आषाढी वारीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या वतीने कौतुकास्पद सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या उपस्थितीत वारकऱ्यांना फराळ, आहार व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.

वारकरी संप्रदायाची सेवा हीच ईश्वरसेवा मानत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालखी मार्गावर विशेष नियोजन केले होते. विठ्ठलनामाच्या अखंड गजरात पंढरीकडे मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांना आदरपूर्वक फराळाचे पाकीट आणि पिण्याच्या पाण्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, तसेच त्यांना प्रवासादरम्यान कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता.

कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत पोलिसांनी वारकऱ्यांच्या आरोग्याची आणि सोयी-सुविधांचीही काळजी घेतल्याने या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधत त्यांना आवश्यक ती मदतही केली. पोलिसांच्या या आपुलकीच्या सेवेमुळे वारकरी संप्रदायाने कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

आषाढी वारीसारख्या पवित्र सोहळ्यात पोलिसांनी दाखविलेली ही संवेदनशीलता आणि सेवाभाव समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, "सुरक्षा आणि सेवा" या ब्रीदवाक्याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

No comments:

Powered by Blogger.