विद्या मंदिर सावर्डे खुर्दच्या ७ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव
विद्या मंदिर सावर्डे खुर्दच्या ७ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव.
~~~~~~~~~~~~~~~~~~~कागल | प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., कोल्हापूर तसेच मा. सुरेश सोनगेकर आणि समन्वय शिक्षक संघटना, कागल यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. यामध्ये विद्या मंदिर सावर्डे खुर्द येथील शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी ठरलेल्या सात विद्यार्थ्यांसह त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री. सरदार कांबळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पाताई खोत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. यावेळी पंचायत समिती कागलच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, जिल्हा परिषद सदस्य शोभाताई फराकटे, सुयशाताई घाटगे, शिवानीताई भोसले, काकासाहेब सावडकर, सुवर्णा कांबळे, पंचायत समिती सदस्य तेजस्विनी भोरे, दत्तात्रय दंडवते, अनिलकुमार हेगडे, बालाजी फराकटे, रंजना अस्वले, रुपाली अंगज, सुवर्णा जाधव, मनीषा पाटील, सुनिता माळी, दीपक सोनार यांच्यासह गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे, शिक्षणाधिकारी सुबोध माने, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. गावडे, सर्व केंद्रप्रमुख, बीआरसी सदस्य, शिष्यवृत्ती नियोजन समितीचे सदस्य, शिक्षक, संघटनेचे पदाधिकारी तसेच शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे मनापासून कौतुक केले. शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देणारी असून अशा स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हे यश पुढील शैक्षणिक वाटचालीतही कायम ठेवून राज्य व राष्ट्रीय स्तरावर नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
विद्या मंदिर सावर्डे खुर्दच्या सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेसाठी उत्कृष्ट मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री. सरदार कांबळे यांच्या कार्याचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. त्यांच्या परिश्रमामुळे विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी, समन्वय शिक्षक संघटना, शिष्यवृत्ती नियोजन समिती तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व शिक्षक, संयोजक व सहकाऱ्यांचे आभार मानण्यात आले. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या यशाला प्रोत्साहन देणारा हा प्रेरणादायी उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


No comments: