सांगलीत अंगणात खेळणाऱ्या २ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याची झडप! हात, पाठ, मांडी अन् खांद्यावर खोल जखमा;
सांगलीत अंगणात खेळणाऱ्या २ वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याची झडप! हात, पाठ, मांडी अन् खांद्यावर खोल जखमा; सिव्हिलमध्ये उपचार सुरू
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सांगली शहरातील एसटी स्टँड परिसरातील बुरले गल्ली, गावभाग येथे अंगणात खेळत असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात ओजस्वी पाटील (वय २, रा. ईश्वरपूर) ही बालिका गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ओजस्वी काही दिवसांपूर्वी सुट्टीसाठी सांगली येथील आपल्या आजीकडे राहण्यासाठी आली होती. घराजवळील अंगणात ती खेळत असताना परिसरातील भटक्या कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घातली. कुत्र्याने चिमुकलीच्या हातावर, पाठीवर, मांडीवर आणि खांद्यावर चावा घेतल्याने खोलवर जखमा झाल्या आहेत.
कुत्र्याच्या हल्ल्याने घाबरलेल्या ओजस्वीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले आणि त्यांनी कुत्र्याला बाजूला केल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर जखमी बालिकेला तातडीने उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
भटक्या कुत्र्यांच्या टोळ्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत!
सांगली शहरातील गावभाग परिसरात भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
निष्पाप जीव गेल्यानंतरच महापालिका प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका आणि आरोग्य विभागाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

No comments: