Header Ads

राधानगरी धरण ८४ टक्के भरले; अवघे ७ फूट बाकी! आज रात्री पावर हाऊसमधून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 राधानगरी धरण ८४ टक्के भरले; अवघे ७ फूट बाकी! आज रात्री पावर हाऊसमधून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; भोगावती नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
राधानगरी | प्रतिनिधी : विजय बकरे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण तब्बल ८४ टक्के भरले असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आता अवघे सात फूट अंतर बाकी आहे. त्यामुळे राधानगरी धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असल्याने पाटबंधारे विभागाने आज बुधवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत पावर हाऊसमधून १,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

धरणाच्या सात स्वयंचलित दरवाज्यांजवळ पाणी पोहोचले असून, धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष आता धरणाच्या पाणीपातळीवर लागले आहे.

पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, राधानगरी धरणाची पाणीपातळी ३४०. 20 फूट झाली असून, जलसाठा 7032. 27 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. बुधवारी सकाळी ६ ते सायंकाळी सहा या अवघ्या 12 तासांच्या कालावधीत धरण परिसरात ७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर १ जून ते २२ जुलै २०२६ या कालावधीत धरण परिसरात आतापर्यंत तब्बल २१२० मिलिमीटर पाऊस झाला आहे.

सततच्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून, भोगावती नदीचा प्रवाहही वेगाने वाढत आहे. पश्चिम घाट परिसरात आणखी पावसाचा अंदाज असल्याने राधानगरी धरण येत्या काही दिवसांत पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता बळावली आहे.

अवघे सात फूट बाकी... राधानगरी धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरू शकते! वाढत्या पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे विभागाने पावर हाऊसमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.