Header Ads

मोकाट कुत्र्यांचा वाढता धोका; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातील चिमुरडीवर हल्ल्याचा प्रयत्न!

 मोकाट कुत्र्यांचा वाढता धोका; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डातील चिमुरडीवर हल्ल्याचा प्रयत्न! उमरखेड नगरपरिषदेने तात्काळ मोकाट कुत्र्याची बंदोबस्त करा; अन्यथा तीव्र जनआंदोलनाचा इशारा..!

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सिद्धार्थ कदम यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

उमरखेड - दि. 20 जुलै : उमरखेड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्ड परिसरात सम्यक बुद्ध विहारासमोर खेळत असलेल्या अवघ्या 9 वर्षीय संघवी सिध्दार्थ दिवेकर या चिमुरडीवर एका मोकाट कुत्र्याने अचानक हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माहितीनुसार, कुत्रा अंगावर धावून आल्याने घाबरलेल्या मुलीने जीव वाचवण्यासाठी धाव घेतली. मात्र मोकाट कुत्र्याने तिचा पाठलाग करत चावा घेण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने मुलीच्या अंगावरील कपडे कुत्र्याच्या तोंडात आल्याने मोठी दुर्घटना टळली. मुलीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील संदेश धबाले सर यांनी प्रसंगावधान राखत काठीच्या सहाय्याने कुत्र्याला हुसकावून लावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि चिमुरडीचा जीव वाचला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मुलगी सुखरूप आहे.

या घटनेमुळे उमरखेड शहरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर बनल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांना रस्त्यावरून ये-जा करताना सतत जीव मुठीत धरून वावरावे लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नागरिकांनी उमरखेड नगरपरिषद प्रशासनाकडे तीव्र संताप व्यक्त करत मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची, त्यांचे निर्बीजीकरण व सुरक्षित पुनर्वसन करण्याची तसेच नागरिकांच्या जीविताच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची जोरदार मागणी केली आहे.

जर यानंतरही प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही आणि भविष्यात अशा घटनांमध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली, तर त्याची संपूर्ण नैतिक व प्रशासकीय जबाबदारी उमरखेड नगरपरिषदेची राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे. तसेच लवकरात लवकर ठोस उपाययोजना न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने प्रभावी कारवाई करावी, अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

No comments:

Powered by Blogger.