ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्याला बेड्या.
ओतूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्याला बेड्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ओतूर(ता. जुन्नर )पोलीसांनी अवैध गोवंश वाहतुकीवर मोठी कारवाई करत 650 किलो गोवंशाचे मांस आणि त्यासाठी वापरण्यात आलेली इको गाडी जप्त केली आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एकजण फरार आहे.
दि. 16 जुलै रोजी रात्री 01:24 वाजताच्या सुमारास अहमदनगर-कल्याण हायवेवर मौजे डिंगोरे, ता. जुन्नर येथील बसस्टॉपजवळ संशयास्पदरित्या उभी असलेली मारुती सुझुकी इको गाडी MH-02 EC-0756 बाबत पोलीस मित्र रविराज देवानंद चाळक यांनी रात्रगस्तीचे अंमलदार पोलीस हवलदार सुरेश गेंगजे यांना माहिती दिली.
माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये बेकायदेशीरपणे कत्तल केलेल्या जनावरांची मुंडकी आणि 650 किलो मांस आढळून आले. बाजारभावानुसार जप्त केलेल्या मांसाची किंमत सुमारे 1,30,000 रुपये आहे.
गाडीचा चालक इरफान गणी शेख, रा. दरोडी, ता. पारनेर, जि. अहमदनगर याला पोलिसांनी गाडीसह ताब्यात घेतले. गाडी मालक युसुफ इक्बाल शेख, रा. आळकुटी, ता. पारनेर, जि. अहमदनगर याच्यासह दोघांविरोधात ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांच्यावर प्राण्यांना क्रूरतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(d)(h) आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन सुधारित कायदा 1995 चे कलम 5(a), 5(c) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी गाडीसह एकूण 3,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या इरफान शेखला न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश साबळे हे करत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल , अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे, पोलीस हवलदार सुरेश गेंगजे, दिनेश साबळे, नामदेव बांबळे, मनोज राठोड, राजेंद्र आमले आणि पोलीस मित्र रविराज चाळक यांनी केली आहे.

No comments: