परळीत गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; सहा कोटींच्या जलजीवन मिशन योजनेवर प्रश्नचिन्ह.
परळीत गढूळ पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त; सहा कोटींच्या जलजीवन मिशन योजनेवर प्रश्नचिन्ह.
------------------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी
अमर इंदलकर
------------------------------------
परळी ग्रामपंचायत हद्दीत गेल्या आठवडाभरापासून नळांमधून गढूळ, दुर्गंधीयुक्त व पिण्यास अयोग्य पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळ्याच्या काळात स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळणे अपेक्षित असताना अनेक भागांत दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे जलजीवन मिशनअंतर्गत सुमारे सहा कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणी व कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले यांच्या प्रयत्नातून परळीसाठी ही महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविणे हा या योजनेचा उद्देश होता. मात्र, काही भागांत अद्यापही नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. सज्जनगड परिसरातही नियमित पाणीपुरवठा सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, जलशुद्धीकरणासाठी आरओ फिल्टर यंत्रणा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले तरी नळांमधून गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व रुग्णांमध्ये जलजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाणीपुरवठा योजनेची तातडीने तांत्रिक तपासणी करून दोष दूर करावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान, परळी ग्रामपंचायतीचे प्रशासक सरपंच बाळकृष्ण विठोबा जाधव (पाटील) यांनी या प्रकाराबाबत ग्रामस्थांची दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, परळी पाणीपुरवठा योजनेच्या नदीपात्रातील जॅकवेल परिसरात कृष्णा खोरे जलसंपदा विभागामार्फत जेसीबीद्वारे खोदकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात माती व गाळ पाण्यात मिसळून तो थेट जॅकवेलमध्ये येत आहे. त्यामुळे पाणी शुद्धीकरण व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला असून काही दिवस गढूळ पाणीपुरवठा झाला.
याबाबत उरमोडी धरणाचे अभियंता श्री कणसे यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली असून संबंधित खोदकाम थांबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच फिल्टरेशन यंत्रणेची स्वच्छता करण्यात आली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे श्री लोखंडे यांना संपूर्ण पाणीपुरवठा योजनेची पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत सूचना देण्यास सांगण्यात आले आहे. नियमितपणे पाणी शुद्ध करण्यासाठी टी-सेल व तुरटीचा वापर सुरू असून नागरिकांना लवकरात लवकर पूर्ववत स्वच्छ व सुरक्षित पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील असल्याचे प्रशासक सरपंचांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नागरिकांनी पाणीपुरवठ्याची गुणवत्ता नियमित तपासावी, गढूळ पाणीपुरवठ्याचे मूळ कारण कायमस्वरूपी दूर करावे आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी केली

No comments: