Header Ads

खामुंडीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 'गुड टच-बॅड टच'वर पोलिसांचे जनजागृती सत्र, मुलांच्या सुरक्षिततेसाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार; विद्यार्थ्यांना 112 क्रमांकाची माहिती

 खामुंडीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 'गुड टच-बॅड टच'वर पोलिसांचे जनजागृती सत्र, मुलांच्या सुरक्षिततेसाठी ओतूर पोलिसांचा पुढाकार; विद्यार्थ्यांना 112 क्रमांकाची माहिती

आळेफाटा :-मुलांची सुरक्षा आणि आत्मसंरक्षण याबत जनजागृती करण्यासाठी ओतूर पोलीस ठाण्याच्या वतीने जुन्नर तालुक्यातील खामुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. 

ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे सत्र पार पडले. यावेळी पोलीस कर्मचारी मयुरी खोसे आणि आशिष जगताप यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

'गुड टच' आणि 'बॅड टच' मधील फरक विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत आणि उदाहरणांसह समजावून सांगण्यात आला. पालक-शिक्षकांचा प्रेमाचा स्पर्श आणि अभिनंदनाची थाप हा 'गुड टच' असून, भीती, लाज किंवा अस्वस्थता निर्माण करणारा कोणताही स्पर्श 'बॅड टच' आहे, हे पटवून देण्यात आले. 

अशा प्रसंगी घाबरून न जाता त्वरित मोठ्यांना सांगावे आणि 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलताना पोलीस कर्मचारी मयुरी खोसे म्हणाल्या, "आपल्या शरीरावर फक्त आपलाच अधिकार आहे. काही चुकीचे घडले तर ते लपवू नका. मोठ्यांना सांगणे हेच खरे धैर्य आहे."

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक बाळू बांगर, शिक्षक संजय आहेर, सुवर्णा नांगरे, सुनीता वर्पे, विष्णू दाते, ज्ञानदेव कांबळे, सोनाली देशपांडे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना हेल्पलाइन क्रमांक असलेली माहितीपत्रके वाटण्यात आली.

ओतूर परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांमध्येही अशा प्रकारचे जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी दिली. या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक बाळू बांगर यांनी ओतूर पोलीस स्टेशनचे आभार मानले.

No comments:

Powered by Blogger.